Ad will apear here
Next
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आणि वाहने


‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’मुळे ऑटोमोबाइल अर्थात वाहन क्षेत्रात मोठे बदल होऊ लागले आहेत. त्यावर एक नजर ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...
............
इंटरनेटमुळे जगभरातील माणसे जोडली गेली आहेतच; पण आता अखंडितपणे संपर्कात राहण्यासाठी इंटरनेटद्वारे निर्जीव गोष्टीही एकमेकांशी जोडल्या जात आहेत. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात आयओटी हे एक असे तंत्रज्ञान आहे, ज्यात जग बदलण्याची प्रचंड क्षमता आहे आणि त्यामुळे आपल्या जगण्याची पद्धतही बदलत आहे. वाहन क्षेत्रातही ‘आयओटी’मुळे मोठे परिवर्तन होत आहे.

‘आयओटी’द्वारे वाहने, वाहनातील वेगवेगळी उपकरणे किंवा भाग आणि इतर संबंधित सेवा एकमेकांशी जोडल्या जातात. त्यामुळे वेळेत निर्णय घेण्यासाठी मदत होते आणि वाहनामध्ये आपण उच्च दर्जाचा अनुभव घेऊ शकतो.

आघाडीचे वाहन उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेते यांनी ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे. ते त्यांच्या व्यवसाय प्रक्रिया त्या अनुषंगाने बदलू लागले आहेत. 

teks.co.in

‘आयओटी’मुळे वाहतूक क्षेत्रात काय काय होऊ शकेल?
‘कनेक्टेड’ वाहतूक सेवा : 
वाहनांशी निगडित ज्या ज्या सेवा आहेत, त्या एकमेकांबरोबर संवाद साधायला लागल्या, तर स्मार्टफोन च्या मदतीने बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. वाहनांमध्ये बायोमेट्रिकची सोय झाली, तर वाहन सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले होईल आणि वाहनचालक अधिकृत आहे ना, ते सहज ठरवता येईल. मोबाइलवरून रहदारीचा अंदाज घेऊन बऱ्याच गोष्टी ठरवणे शक्य होईल. आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनास प्राधान्य देता येईल. वाहतूक कशी चालू आहे, हे बघून अधिकाऱ्यांना निर्णय घेता येतील. त्याप्रमाणे व्यवस्थेत बदल करता येईल. वाहतूक सुरळीत चालण्याच्या दृष्टीने त्यावर नियंत्रण ठेवता येईल. यामधूनच सुरक्षितता, ऊर्जाबचतीसह वाहतुकीशी संबंधित गोष्टींचे नियोजन योग्य प्रकारे करता येईल.

वाहनांमधील समन्वय : 
अधिकाधिक ‘कनेक्टेड’ वाहने दिसू लागली, की त्यातील एकमेकांशी होणारा संवाद हे नेहमीचेच होऊन जाईल. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील अनेक नवनवीन उदाहरणे समोर येत आहेत. वाहनांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी पुढील गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

एका वाहनाचा दुसऱ्या वाहनाशी होणारा संवाद : वाहने एकमेकांना गती आणि स्थिती या विषयीची माहिती सतत देत राहतील, जेणेकरून वाहनांमध्ये बसवलेल्या आयओटी साधनाला आणि वाहनचालकाला निर्णय घ्यायला, गाडी चालवायला मदत होते.

वाहनाचा बाकीच्या व्यवस्थेशी होणारा संवाद : यामध्ये वाहने रस्त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींबरोबर संवाद साधतील. उदाहरणार्थ - रस्ते, डिजिटल चिन्हे, सिग्नल, सुरक्षा आणि नियंत्रण प्रणाली. यातून सुरक्षितता, वेग आणि पर्यावरण या गोष्टींशी संबंधित फायदे होतील. अपघात, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मदत होते.

वाहनाचा विक्रेत्यांबरोबर होणारा संवाद : बरेच छोटे छोटे उद्योगसुद्धा ‘आयओटी’चा वापर करून नावीन्यपूर्ण पद्धतीने विक्री कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. वाहन साधारण कुठे आहे, कुठे चालले आहे, कुठे थांबत आहे या माहितीवरून त्याच्या आसपासच्या स्थान-आधारित जाहिराती दाखवल्या जातील. तिथे केलेल्या खरेदीत किंवा एखाद्या उपाहारगृहात काही सवलत देऊ केली जाऊ शकेल. 



अद्ययावत वाहतूक : 
पथकर अर्थात टोल जमा करणारी अद्ययावत प्रणाली वापरल्यास वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब टाळता येतो. ‘फास्टटॅग’ हे त्याचे उदाहरण आहे.

पार्किंगसाठी जागेचा अभाव आणि गाड्यांची वाढती संख्या यांमुळे पार्किंगसाठी मोकळी जागा शोधणे कंटाळवाणे होते. ‘स्मार्ट पार्किंग’मुळे जागेचा वापर अधिक चांगला करता येईल, योग्य पद्धतीने वाहने लावता येतील आणि वाहतूक सुरळीत होईल.

रस्त्यावरील प्रकाश यंत्रणा अद्ययावत असल्यास आकाशातील उजेडाप्रमाणे आणि रस्त्यावर कोण आहे-नाही ते बघून तीव्रता कमी-जास्त करणे किंवा चालू-बंद करणे ‘आयओटी’च्या वापरामुळे सहज शक्य आहे. अशा प्रकारे नावीन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वाचवता येते.

याचबरोबर वाहने कुठून कुठे जात आहेत, कुठे थांबत आहेत, किती वेगात आहेत, किती इंधनाचा वापर करत आहेत, किती प्रदूषण करत आहेत ही सगळीच माहिती संकलित करणे ‘आयओटी’मुळे सोपे होईल.

वाहन उत्पादनातील पुरवठा व्यवस्था : 
वाहन तयार करायला लागणारे वेगवेगळे घटक आणि त्यांचे व्यवस्थापन, प्रभावी उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता हमी, वितरण व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींमध्ये ‘आयओटी’चा वापर केला जाईल. त्यातून अधिक चांगल्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात वाहने उत्पादित कशी करता येतील यावर भर दिला जाईल. ‘आयओटी’चा वापर करून कारखान्यांमध्ये होणारे काम आणि व्यवस्थापक मंडळी यांमध्ये पारदर्शकता येते. सगळेच स्वयंचलित असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये अनावश्यक बदल होणे किंवा कामापासून विचलित होणे या गोष्टी सहज टाळता येतात. सध्या बऱ्याच वाहन उद्योगांमध्ये या गोष्टींचा वापर करण्याबद्दल विचार सुरू आहे. काही उद्योगांमध्ये याचा वापर सुरूदेखील झाला आहे.

नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाहने : चालकाशिवाय चालणारे वाहन ही संकल्पना आता प्रत्यक्षात आली आहे. त्यात ‘आयओटी’चाच वापर करण्यात आला आहे. विजेवर चालणारी म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेइकल्सदेखील नवीन तंत्रज्ञानावरच आधारित आहेत.

‘आयओटी’चे वाहन क्षेत्रातील वापराचे अनेक फायदे आहेत. वाहनचालक आणि सुरक्षा अधिकारी यांना योग्य वेळी योग्य ती माहिती मिळाल्यामुळे वेळेत निर्णय घेऊन त्यावर कारवाई करणे सहज शक्य होणार आहे.

- अनुष्का शेंबेकर
ई-मेल : anushka19@gmail. com

(लेखिका माहिती-तंत्रज्ञान विषयातील इंजिनीअर असून, पुण्यातील ऑलिफाँट सोल्युशन्स या कंपनीच्या संस्थापक सीईओ आहेत. माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांत त्या १२हून अधिक वर्षे कार्यरत असून, या क्षेत्रातील नवे ट्रेंड्स हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

(‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ हे सदर दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZYXCE
 अप्रतिम लेख. आयओटि चे महत्व अतिशय सुंदर रितीने सामान्य माणसांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितले आहे. खरच याची जरुरी आहे. खुप प्रमाणात वाहतूक व्यवस्थेत फरक जाणवेल. अभिनंदन.6
 Very informative on IOT subject. Only thing low cost solution to be provided to spread in mass scale.4
Similar Posts
शिक्षण क्षेत्रात ‘आयओटी’चा उपयोग! शिक्षण क्षेत्रात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, याविषयी पाहू या ‘इंटरनेट यत्र, तत्र, सर्वत्र’ या सदराच्या आजच्या भागात...
शेतीमध्येही ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’ तंत्रज्ञान शेती क्षेत्रातही उपयोगी ठरू शकते. त्यावर एक नजर ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...
इंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र! ‘इंटरनेट’ ही गोष्ट आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत चालली आहे. इंटरनेटमुळे दूरवरच्या माणसांमधील संवाद सुलभ झाला. आता या इंटरनेटमुळे वेगवेगळी साधने, यंत्रेही एकमेकांशी संवाद साधू लागली आहेत. त्यालाच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ असे म्हणतात. त्यामुळे जवळपास प्रत्येक क्षेत्रातील कामे सोपी होणार
लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये ‘आयओटी’चा वापर लघू व मध्यम उद्योग अर्थात ‘एसएमई’मध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, यावर एक नजर... ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’च्या आजच्या भागात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language